पुणे, ता. 26 : पुणे शहरात विश्वासाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरातील विश्वासू समजल्या जाणाऱ्या चालकानेच मालकाच्या आईचे मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी चपळ तपास करत सुमारे १५ लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. Pune News
राजेश परशुराम कांबळे (वय ४०, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकाराई फारुख अब्दुल हमीद हमदुले (वय ५७, रा. कोणार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी फारुख हमदुले यांनी २० एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातील आईचे मौल्यवान सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यात आली. Pune News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती, घरातील व्यक्तींची हालचाल, तसेच सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करताना संशयाची सुई घरातीलच चालकाकडे वळली. पोलिसांनी कौशल्याने सापळा रचत चालक राजेश कांबळे याला ताब्यात घेतले. Pune News
चौकशीत आरोपी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या बारकाईच्या तपास आणि पुराव्यांच्या आधारे त्याला गुन्ह्याची कबुली द्यावी लागली. आरोपीने चोरी केलेले दागिने वितळवून त्याची सोन्याची लगड तयार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. पोलिसांनी ही लगड जप्त करून तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. Pune News
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील ,पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कन्हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार यांच्या पथकाने केली आहे. Pune News







