पुणे: पुणे-नाशिक रेल्वे मार्ग शिर्डीमार्गे (Pune-Nashik Railway Route) वळवण्याचा निर्णय जाहीर (Pune News) झाल्यानंतर आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला मोठा फटका बसल्याची भावना नागरिक, व्यापारी, शेतकरी आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये आहे. गेल्या 30 वर्षांपासून पुणे-नाशिक रेल्वे मार्ग आंबेगाव-जुन्नर मार्गे जाणार, अशी अपेक्षा या भागातील लोकांनी ठेवली होती. याच मार्गाचे 3 वेळा सर्वेक्षण झाले होते आणि खेड-मंचर परिसरात भूसंपादनही करण्यात आले होते. काही शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला देखील देण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे मार्ग निश्चित झाल्याचा विश्वास निर्माण झाला होता.

मात्र आता रेल्वे मार्ग थेट शिर्डीकडे वळवल्याने आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासाला खिळ बसली असल्याचे मत व्यक्त होत आहे. हा परिसर पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी भागही आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर, अष्टविनायकांपैकी ओझर आणि लेण्याद्री तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी यासारखी जागतिक कीर्तीची स्थळे या भागात आहेत. रेल्वे मार्ग बदलल्याने ही ठिकाणे रेल्वे सुविधेपासून दूर गेली असून त्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेल्वे आंबेगाव-जुन्नर मार्गे गेली असती तर उद्योग, व्यापार आणि शेतीला मोठी चालना मिळाली असती. मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि पुणे-नाशिक बाजारपेठांशी थेट संपर्क साधणे शक्य झाले असते. व्यापाऱ्यांच्या मते या निर्णयामुळे व्यवसायाच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. पर्यटन व्यवसायिकांचेही मोठे नुकसान होणार असल्याची भावना असून रेल्वेमुळे पर्यटकांची संख्या वाढून हॉटेल व्यवसाय दुप्पट झाला असता, असे मत व्यक्त होत आहे.
या निर्णयामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील तरुणांच्या रोजगाराच्या संधीवरही परिणाम होणार आहे. रेल्वेमुळे या भागाचा संपूर्ण नकाशाच बदलणार, असा विश्वास नागरिकांना होता. मात्र आता प्रकल्प दूर गेल्याने विकासाचे दार बंद झाले असल्याची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी योग्य पातळीवर पाठपुरावा न केल्याची चर्चा जोर धरत असून, रेल्वे प्रकल्पावर पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.







