कानपुर: उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील (Crime News) जालौन येथील कोंच पोलीस ठाण्यात (Kanpur News) घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अरुण कुमार राय असे आत्महत्या केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात आता दररोज नवे खुलासे समोर येत असून, एका महिला कॉन्स्टेबलसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कुमार राय यांची एका महिला कॉन्स्टेबलसोबत जवळीक वाढली होती. या जवळिकीदरम्यान संबंधित महिला कॉन्स्टेबलने अरुण राय यांचे काही व्हिडिओ आणि चॅट्स आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते. त्याच आधारे ती त्यांना सतत मानसिक तणाव देत होती, असा आरोप सहकारी पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा हिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्या मोबाईलचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयास्पद मेसेज पोलिसांना आढळून आले आहेत.
अरुण कुमार राय यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी माया राय यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मीनाक्षी शर्मा हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 14 मार्च 2024 रोजी मीनाक्षी शर्मा यांची कोंच पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यानंतर 5 जुलै 2024 रोजी अरुण कुमार राय यांनी कोंच पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर इनचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. दोघे सुमारे 7 महिने एकाच ठिकाणी कार्यरत होते.
22 फेब्रुवारी 2025 रोजी अरुण राय यांची ओराई पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली, तर 28 एप्रिल 2025 रोजी मीनाक्षी शर्मा हिला यूपी 112 युनिट-1577 येथे पाठवण्यात आले. बदलीनंतरही मीनाक्षी शर्मा सतत अरुण राय यांच्याशी संपर्कात होती. ती त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन वाद घालत असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या मानसिक तणावामुळे अरुण राय यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाला आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.
घटनास्थळावरून एक पत्रही पोलिसांना सापडले असून मोबाईल कॉल डिटेल्स आणि चॅट्सच्या आधारे प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपासातून नेमकी सत्यस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.






