पुणे: पुण्यात सायबर चोरट्यांनी (Pune Crime) वेगवेगळ्या घटनांमध्ये बँक (Pune News) खातेदारांची तब्बल 38 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. बँक खात्याला जोडलेले मोबाइल क्रमांक हॅक करून गोपनीय माहिती मिळवत ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा आणि मुंढवा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोंढवा परिसरातील एका 55 वर्षीय नागरिकाने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून परस्पर 29 लाख 98 हजार 977 रुपये काढून घेण्यात आले. खात्यातून मोठी रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप करत आहेत.
अशाच प्रकारची आणखी एक घटना मुंढवा परिसरात घडली आहे. येथेही सायबर चोरट्यांनी एका नागरिकाच्या बँक खात्यातून परस्पर 8 लाख 50 हजार रुपये लांबवले. संबंधित नागरिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक करत आहेत.
सायबर चोरटे बँक खात्यांशी जोडलेले मोबाइल क्रमांक हॅक करून ओटीपी आणि इतर गोपनीय माहिती मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीचा गैरवापर करून खात्यातील रक्कम काढून घेतली जात आहे. नागरिकांनी कोणतेही ओटीपी, बँक तपशील किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये तसेच संशयास्पद कॉल किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






