पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध शस्त्रास्त्रांचा साठा होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी कंबर कसली असतानाच, स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली. जुन्नर ते नारायणगाव मार्गावर एका कारमधून तब्बल 12 धारदार तलवारींची तस्करी करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे उत्तर पुणे जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रे पुरवणारी एखादी मोठी टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

29 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात गस्त घालत असताना, सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना एका खात्रीशीर खबऱ्याकडून माहिती मिळाली. ‘सुझुकी एस्टीम’ (क्र. MH 12 DE 2767) या जुन्या कारमधून मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा नारायणगावच्या दिशेने जात असल्याचे समजताच, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. नारायणगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी कार अडवली.
गाडीची झडती घेतली असता, कारमध्ये अतिशय खुबीने लपवून ठेवलेल्या 10 मोठ्या आणि 2 लहान अशा एकूण 12 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी शिपाई मोहल्ला, जुन्नर येथील सालीम साजिद पठाण याला रंगेहाथ अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.








