मुंबई: महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘शक्तिपीठ महामार्ग’ आता नव्या रूपात समोर येणार आहे. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर राज्य सरकारने या महामार्गाच्या मूळ आराखड्यात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ रस्ताच नाही, तर राज्याची धार्मिक आणि आर्थिक नाडी जोडणारा हा प्रकल्प आता अधिक व्यापक झाला असून, त्यात सातारा जिल्ह्याचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर ते गोवा हा 18 तासांचा प्रवास केवळ 8 तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

का फिरवला नकाशा?
फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा या 802 किमी लांबीच्या प्रकल्पाची घोषणा झाली, तेव्हापासूनच भूसंपादनाचा मुद्दा गाजला. विशेषतः कोल्हापूर आणि सांगलीतील सुपिक जमिनी महामार्गात जात असल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला. दरम्यान, सरकारने लवचिकता दाखवत जुन्या आराखड्यात सुधारणा करून आता हा मार्ग 856 किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त धार्मिक स्थळे जोडली जातील आणि लोकांचा विरोधही मावळेल.
काय बदलले?
सुधारित नियोजनानुसार हा महामार्ग आता 13 जिल्ह्यांतील 40 तालुक्यांमधून जाणार आहे. वर्ध्याच्या दिग्रजपासून सुरू होणारा हा प्रवास सिंधुदुर्गमधील बांदा येथे संपेल. सातारा जिल्ह्याचा यात नव्याने समावेश झाला आहे.

नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील मार्गात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची भवानी माता आणि कोल्हापूरची अंबाबाई या प्रमुख शक्तिपीठांसह औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर आणि नृसिंहवाडी यांसारखी अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रेही या मार्गामध्ये येणार आहेत.







