पुणे : नाशिक- पुणे या २३२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी महारेलच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे.
महारेलने अधिकार्यांच्या बदल्या केल्याने भूसंपादन आणि संयुक्त मोजणी रखडली आहे. बदली केलेल्या अधिकार्यांच्या जागेवर नविन अधिकारी नियुक्त न करण्यात आल्याने प्रकल्पातील कामांना ब्रेक लागला आहे. महारेलला नविन अधिकारी मिळेपर्यत महसुल प्रशासनाकडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
प्रकल्पाच्या घोषणेपासून ते आजतागायत शेतकर्यांचा विरोध, संयुक्त मोजणी, प्रकल्पासाठी तीनदा बदलेली रचना अशी अडथळ्यांची शर्यत कायम आहे. शासनाने महारेलचे नाशिकमधील उपमहाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांची बदली केल्याने या विभागाच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा फटका प्रकल्पाला बसतो आहे.
सिन्नर व नाशिक तालुक्यात प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना शेतकर्यांच्या होणारा विरोध कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करते आहे. पण महारेलकडून पहिलेपासून मिळणार संथ प्रतिसाद आणि त्यातच अधिकार्यांच्या बदल्यांमुळे प्रकल्पासाठी जमीन खरेदी व अन्य बाबी थंड बस्त्यात गेल्या आहेत.