Pune Municipal Corporation Election: पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक सध्या चांगलीच तापली असून प्रभाग क्रमांक 9 हा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागात एकामागून एक घडामोडी घडत असून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सुरुवातीला भाजपने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळेच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला. ( Municipal Corporation Election)

यानंतर आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले. आता याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिसांनी एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांच्या मुलगा किरण चांदेरे याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाजपचे उमेदवार गणेश कळमकर आणि लहू बालवडकर यांनी आरोप केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांचा मुलगा किरण चांदेरे मतदारांना पैसे वाटत होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर गणेश कळमकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचेही सांगण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर बाणेर पोलिस ठाण्यात किरण चांदेरे यांच्यासह इतर 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदार यादी बाळगणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे आणि आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 223, कलम 171 आणि कलम 74 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, बाबुराव चांदेरे हे पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. या प्रकरणामुळे निवडणुकीतील वातावरण अधिक तापले असून भाजपकडून चांदेरे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 9 कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.







