दौंड: दौंड तालुक्यात खोरवडी आणि आलेगाव परिसरात मध्यरात्री दरोड्यांचे सत्र सुरु आहे. हातात धारदार कोयते आणि सुऱ्या घेऊन आलेल्या एका सशस्त्र टोळीने अर्ध्या-अर्ध्या तासाच्या अंतराने एकापाठोपाठ 4 ठिकाणी दरोडे टाकून संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दरोड्याची ही मालिका खोरवडी जवळील बावरीनगर येथून सुरू झाली. सिधू शिंदे (60) यांच्या घरात घुसून चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शिंदे यांच्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पहिल्याच दरोड्यात लंपास केला.
अवघ्या 30 मिनिटांत टोळीने आवदे वस्तीवर हल्ला केला. तिथे महिलांना शस्त्राचा धाक दाखवून 1 लाख 39 हजारांचे दागिने चोरले. ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली.
या टोळीने मोर्चा त्यानंतर मुकिंदा चलवादी (43) यांच्या विटभट्टीमध्ये जाऊन कपाट आणि लाकडी दरवाजे तोडून आत प्रवेश करत त्यांनी मुकिंदा यांना मारहाण केली आणि 25 हजारांची दुचाकी घेऊन टोळी पुढे निघाली. पहाटे 3 वाजता ही टोळी आलेगाव येथील धुमाळवस्तीवर पोहोचली. तिथे झोपलेल्या मीना कदम यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. पळून जाताना दरोडेखोरांनी तिथली एक मोटारसायकलही चोरली आणि एकूण 60 हजारांचा माल लंपास केला.
एकाच रात्री, एकाच पॅटर्नने आणि अर्ध्या तासाच्या अंतराने झालेले हे चारही दरोडे एकाच सराईत गुन्हेगार टोळीने घातल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.






