यवत, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील एका मोठ्या जमिनीचा व्यवहार करून देतो असे सांगून एका शेतकऱ्याची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 16/11/2024 ते 11/06/2026 या कालावधीत भांडगाव (ता. दौंड) हद्दीत घडली. याप्रकरणी एकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास भाउसो दोरगे, वय 44, व्यवसाय शेती, रा. भांडगाव ता. दौंड जि पुणे) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर योगेश रमेशलाल बळकट (रा. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, पुणे) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. जमीन स्वतःच्या नावावर करून खरेदीखत करून देतो, असा खोटा विश्वास देऊन बळकट यांनी ही रक्कम बँक खात्याद्वारे लाटल्याचा दोरगे यांचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास दोरगे यांची ओळख आरोपी योगेश बळकट याच्याशी झाली होती. आरोपी योगेश याने दोरगे यांना सांगितले की, मोहमंद मोबीन मोहमंद मनसूर शेख यांच्या नावावर असलेली टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील जमीन गट नं. 147 /क मधील 13 एकर क्षेत्र विक्रीसाठी उपलब्ध आहे. “सदर 13 एकर जमीन पहिल्यांदा मी स्वतःच्या नावावर करून घेतो.
त्या जमिनीचा 7/12 माझ्या नावावर झाल्यानंतर, मी लगेचच त्या जमिनीचे खरेदीखत करून ती तुमच्या नावे करून देतो,” अशी भूलथाप मारली. आरोपीने त्याच्या बोलण्यातून विलास दोरगे यांचा पूर्ण विश्वास संपादन केला. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शेतकरी विलास दोरगे यांनी जमिनीच्या व्यवहारापोटी तब्बल 1 कोटी रुपये थेट आर.टी.जी.एस. (RTGS) द्वारे आरोपी योगेश बळकट याच्या बँक खात्यावर वर्ग केले. हा संपूर्ण व्यवहार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पासून ते 11/06 2026 सुरू होता.
ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे आरोपी बळकट याने ती शेतजमीन फिर्यादी दोरगे यांच्या नावे करून दिली नाही. जेव्हा विलास दोरगे यांनी आपली जमीन किंवा दिलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली, तेव्हा आरोपीने पैसे देण्यास स्पष्ट नकार देत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोरगे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रर दिली.
दरम्यान, दोरगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी योगेश रमेशलाल बळकट याच्यावर विविध कलमान्वये फास्व्नुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.






