पुणे, ता. १२ : मुंढवा पोलिसांनी तब्बल १५ दिवस गुप्त तपास करून हडपसर, फुरसुंगी आणि भेकराईनगर परिसरातील पाच ठिकाणी छापेमारी करत ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बेकायदेशीर कॉल सेंटर उघडकीस आणले आहे. या कारवाईत दोन प्रमुख सूत्रधारांना अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस, सायबर पोलीस आणि हडपसर पोलिसांच्या संयुक्त पथकाने १० जून रोजी दुपारी सुरू केलेली कारवाई तब्बल १७ तास सुरू होती. त्यानंतर उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात संतोष दत्ता वेंजणेकर (वय ४७, रा. भेकराईनगर) आणि विनायक ऊर्फ दीपक मनोहर इक्के (वय ४०, रा. फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांना फोन करून ऑनलाइन गेमिंगमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत होते. सुरुवातीला काही रकमेचा लाभ मिळाल्याचा आभास निर्माण करून नंतर अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते. या माध्यमातून दररोज शेकडो नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तपासात दुबईस्थित अमित मजेटिया हा या रॅकेटचा महत्त्वाचा दुवा असल्याचे निष्पन्न झाले असून, भागिरथ पांड्या आर्थिक व्यवहार हाताळत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी हार्ड डिस्क, सर्व्हर, ऑटो डायलर मशीन, सीम कार्ड, लॅपटॉप, मोबाईल, विविध बँकांची कागदपत्रे, एटीएम कार्ड, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली.
याशिवाय, कॉल सेंटरमध्ये अल्पवयीन मुलामुलींना कामावर ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीर काम करून घेतल्याचाही आरोप समोर आला आहे. या प्रकरणी आणखी काही कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुढील तपास सुरू आहे.






