Pune Crime : पुण्यासारख्या महानगरात ‘हायफाय’ जीवनशैली जगण्यासाठी लागणारा पैसा पुरत नसल्यामुळे बी.टेक शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने धक्कादायक निर्णय घेतला. मौज-मजा करायला पैसे पुरत नाहीत. त्याने थेट आपल्या दोन मित्रांना हाताशी धरत स्वतःच्याच घरात चोरी घडवून आणली. धुळ्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी विद्यार्थी सध्या पुण्यात शिक्षण घेत असून मित्रांसोबत मौज मज्जा करायला, हायफाय जीवन जगण्याचा त्याचा प्रयत्न होता. या खर्चासाठी घरच्यांकडून मिळणारा पैसा पुरत नव्हता. त्यामुळे घरातूनच मोठी रक्कम चोरण्याचा डाव त्याने आखला. ठरलेल्या दिवशी दोघा मित्रांना बोलावून त्याने घरातील दागिने व रोकड चोरून नेण्यास सांगितले. बाहेरील व्यक्तीकडून चोरी झाल्याचा भास निर्माण करण्यासाठी घरातील वस्तू अस्ताव्यस्त केल्या गेल्या.
घरातील चोरी लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड व विद्यार्थ्याच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची ‘कहाणी’ उघडकीस आली. अखेर विद्यार्थ्यासह दोन्ही मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.
तरुणाईत वाढत चाललेल्या दिखाऊ जीवनशैलीच्या मोहामुळे गुन्हेगारीची वाट पकडली जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. शिक्षणासाठी शहरात आलेल्या युवकाने अशा प्रकारचा मार्ग स्वीकारल्याने पालकांमध्येही चिंता वाढली आहे.






