उरुळी कांचन, (पुणे) : तु माझ्या साईटवर माल टाकु नको, मी तुझ्या साईटवर कधी माल टाकतो का या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणाला लोखंडी वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. ०८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील ज्ञानेश्वर लाड (वय- २४, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आकाश उर्फ भैय्या धोंडीबा कुरकुंडे (वय-२४, रा. तरडे, ता. हवेली) याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल लाड हे चालक असून ते इमारतीसाठी लागणारे साहित्य पुरवण्याचे काम करतात. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी हद्दीतून घरी निघाले होते. यावेळी रत्यावरून आकाश कुरकुंडे हा निघाला होता. यावेळी निखील याने आकाशला तु माझ्या साईटवर माल टाकु नको, मी तुझ्या साईटवर कधी माल टाकतो का अशी विचारणा केली.
या गोष्टीचा राग आल्याने आकाशने निखील याला शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच रस्त्याच्या बाजूला जोरात ढकलुन दिल्याने निखीलच्या तोंडास, नाकास, कपाळावर दुखापत झाली. दरम्यान, आकाश याने निखीलच्या पाठीवर लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करीत आहेत.