Pune Accident : पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अपघातात (Accdient) एका 59 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने आलेल्या कारने मागून धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. गंभीर दुखापतींमुळे संबंधित अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास चिखली येथील थर्मॅक्स चौक ते आकुर्डीतील खंडोबा माळ या रस्त्यावर घडली. मृत अधिकाऱ्याची ओळख रामखिलवान यादव (वय 59, रा. चिखली) अशी झाली आहे. ते पायी जात असताना मागून वेगात येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली.
या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान यादव यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ दिवाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख संजय रमेश जिंदाल (वय 56, रा. निगडी प्राधिकरण) अशी झाली आहे. तो MH 14 KN 6825 या क्रमांकाची कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाढलेल्या बेदरकार वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






