डॉ. अशोक बालगुडे

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येणार, स्वागताची तयारी होणार, मान्यवरांची मांदियाळी जमणार… पण दौऱ्याची तारीखच पुन्हा पुढे सरकली! शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे 16 नोव्हेंबरचा नियोजित दौरा लांबणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बारामतीतील प्रेरणास्थळाच्या उद्घाटनाचा मुहूर्तही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे.
राजकारणात भेटीगाठींचे मुहूर्त साधले जातात, पण या भेटीचा मुहूर्त काही केल्या जुळत नाही, अशीच स्थिती! आधी 3 नोव्हेंबर, त्यानंतर 16 नोव्हेंबर आणि आता पुढची तारीख गुलदस्त्यात. दौऱ्याचे नियोजन झाले, निमंत्रणे गेली, उत्सुकता वाढली; पण प्रत्यक्ष कार्यक्रमाला मात्र प्रतीक्षेचे ग्रहण लागले आहे.

विद्या प्रतिष्ठानमधील प्रेरणास्थळाचे उद्घाटन आणि विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम नियोजित आहे. पंतप्रधानांचा दौरा प्रतिष्ठेचा, आयोजन भव्य आणि पाहुणे महत्त्वाचे; पण तारीख ठरणार कधी? राजकारणात शब्दांना वजन असते, कार्यक्रमांना मुहूर्त असतो आणि दौऱ्यांना वेळापत्रक! आता बारामतीकरांना नव्या तारखेची घोषणा ऐकण्याची प्रतीक्षा आहे.
दौरा पुढे ढकलला, उत्सुकता मात्र मागे हटायला तयार नाही!







