उरुळी कांचन, (पुणे) : पोलिस असल्याची बतावणी करत पोलिसांचे नकली ओळखपत्र दाखवून टेम्पो चालकाजवळील सुमारे दोन लाख रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उरुळी कांचन – सासवड राज्यमार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुरुकृपा प्रोडक्ट गॅलेक्झी डोअर या दुकानाचे जवळ मंगळवारी (ता. 10) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानाच्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी व्यंकटरमना मुन्नाकापु उल्ली (वय-29 वर्ष, व्यवसाय-ड्रायव्हर, रा छलगमपडु, नरेंद्रपुरम, ता. राजानगरम, जि. पुर्व गोदावरी, राज्य आंध्र प्रदेश) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांच्या विरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटरमना उल्ली हे तीन कामगारांसह शिंदवणे (ता. हवेली) गावचे हद्दीत गुरुकृपा प्रोडक्ट गैलेक्सी डोजर या दुकानाच्या जवळ त्याच्या आयशर टेम्पोसह थांबले होते.
यावेळी पाठीमागुन आलेल्या एक काळी निळी रंगाची यमाहा कंपनीची एफ झेड (गाडी नबंर माहीत नाही) यावरीळ दोन अनोळखी इसमांनी येऊन त्याचे जवळ असलेले पोलीस आयकार्ड दाखवला व चालक व त्यांच्या बरोबर असलेल्या दोघांचा विश्वास संपादन केला. लगेच कार्ड खिशात ठेऊन देत त्यातील आरोपी एक इसम व्यंकटरमना उल्ली यांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये गांजा घेवुन जात आहात आम्हाला तुमच्या टेम्पोची चेकिंग करायची आहे, असे म्हणून केबिनचे डॅशबोर्ड उघडले.
यावेळी गाडी चेक करताना त्यातील दोघांनी डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले 2 लाख 50 हजार रोख रक्कमेपैकी 2 लाख 5 हजार रूपये घेऊन पोबारा केला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे करीत आहेत.