अजित जगताप
वडूज : खटाव- माण तालुक्यातील येरळामाई नदीच्या स्वच्छ स्वच्छतेसाठी वडूज परिसरातील ‘प्रयास’ कार्यकर्त्यांनी नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. भर उन्हात कार्यकर्ते नदीची स्वच्छता राखण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
येरळा नदी म्हणजे खटाव- माण तालुक्यातील जलमाता आहे. परंतु पर्यावरण प्रेमी तसेच जागरूक नागरिक वगळता याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे सध्या येरळा नदी परिसरात जंगली झाडे झुडपे तसेच सांडपाणी व टाकाऊ वस्तु टाकण्याचे काम राजरोसपणे होत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक मान्यवरांनी निशुल्क व स्वयं कष्टाने ‘प्रयास’ करीत आहेत. त्यामुळे आता या येरळामाईचे रूप बदलू लागलेले आहे. आतापर्यंत सामाजिक संस्थेच्या वतीने पाच ते आठ टन टाकाऊ वस्तु व कचरा नदीपात्रातून नष्ट केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंडलिक मांडवे ,प्रवीण चव्हाण, ईश्वर जाधव, मुन्ना मुल्ला, संतोष देशमाने, रोहित शहा, अलोक महाजन, विशाल भागवत, अरविंद शहा, शशिकांत गोडसे, धनंजय गोडसे तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वच्छतेसाठी हातभार लावत आहेत. यासंदर्भात स्वतः माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.