लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती परिसरातील पांडवदंड येथील रहिवासी प्रज्वल तानाजी मादळे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. हे यश मिळवल्याबदल रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला आहे.
रेनबो इंटरनॅशनलस्कूलचे अध्यक्ष नितीन काळभोर यांच्या हस्ते श्रीफळ, शाल, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रज्वल मादळे यांच्या मातोश्री माधवी मादळे, प्राचार्या मिनल बंडगर, उपप्राचार्य प्रशांत लाव्हरे, पर्यवेक्षिका पायल बोळे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. यावेळी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या ठिकाणी प्रज्वल मादळे याचे परिसरात कौतुक केले जात आहे.
शाळेच्या शिक्षिका निलोफर तांबोळी यांनी प्रज्वल मादळे यांचे स्वागत करून परिचय करून दिला. प्रज्वल मादळे प्रशिक्षणासाठी बिहार येथे जाणार आहे. आई -वडील व त्यांची मोठी बहीण ज्योती मादळे हे त्यांचे प्रेरणा स्थान असून वडील तानाजी मादळे हे देखील लष्कर दलातून सेवानिवृत्त आहेत. घरातूनच प्रज्वल यांना सैनिक भरतीचे बाळकडू मिळाले त्यामुळे आज ते या पदापर्यंत पोहचू शकले आहेत. विद्यार्थ्यांशी त्यांची मेहनत, चिकाटी व लष्कर भरतीसाठीचे अनुभव सांगितले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळाली.
दरम्यान, रेनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये सतत असे प्रेरणादायी व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. अशा शालेय भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये लष्कराविषयी कुतूहल निर्माण होते आणि त्यांच्या मनात देशसेवेची भावना दृढ होते. कार्यक्रमाच्या शेवटी नितीन काळभोर यांनी विद्यार्थ्याना आपले ध्येय ठरून त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी सुरुवात करण्यास सांगितले. तसेच प्रज्वल तानाजी मादळे व त्यांच्या आई यांचे देखील आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.