पुणे : राज्यातील पोल्ट्री शेतकऱ्यांची विविध प्रश्नांवर मुंबई येथील आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. हि माहिती महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. सलग दुसऱ्यांदा आयोजित केलेली बैठक रद्द झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
राज्यातील पोल्ट्री शेतकरी व्यवसायिकांचे विविध प्रश्न आणि समस्या आहेत. यामध्ये अंडी व चिकनचे दर, पोल्ट्री खाद्याचे दर, कुक्कुट पिल्लांचे (चिक्स) दर तसेच शेतक-यांना देण्यात येणारे शुल्क वाढ (ग्रोविंग चार्जेस) या संदर्भात पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात बैठक आज गुरुवारी (ता.२०) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आयोजित आयोजित करण्यात आली होती. ती बैठक रद्द करण्यात आली आहे.
राज्यातील पोल्ट्री शेतकऱ्यांची विविध प्रश्नांवर पहिली बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर काही कारणास्तव पुण्यातील बैठक पुढे ढकलून मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने आता मुंबईत होणारी बैठक रद्द केली आहे. आणि पुढील बैठकीचे स्थळ आणि ठिकाण आपल्याला कळविण्यात येईल. असे परिपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील पोल्ट्री शेतकरीवर्ग हा आज गुरुवारी बैठक असल्याने राज्यातील विविध भागातून कालच निघाला होता. प्रवासा दरम्यानच त्यांना बैठक रद्द झाल्याचे समजल्याने त्यांची धावपळ झाली आहे. आत्ता मुंबईला जावे कि. परत माघारी घरी जावे. अशी द्विदावस्था झाली होती. अशी अचानक बैठक रद्द झाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
याबाबत बोलताना पुणे जिल्हा पोल्ट्री योध्दा संघटक नंदकुमार चौधरी म्हणाले कि, राज्यातील पोल्ट्री शेतकरीवर्ग हा ग्रोविंग चार्जेस नसल्याने अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढील प्रशासनाने बैठकीचे स्थळ आणि ठिकाण लवकर सांगावे. अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.