पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची डागडुजी करण्यासाठी आता ख्यातनाम राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेतली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नुकतीच मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी प्रशांत किशोर, पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती, पक्षाची भवितव्यातील दिशा आणि जनमत चाचण्यांवर सविस्तर चर्चा झाली.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे ज्येष्ठ नेतेही काहीसे दुरावल्याची चर्चा आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा आणि तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा उल्लेख टाळल्यामुळे अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

पक्षामधील ही जुंपलेली जुंप आणि नकारात्मक प्रतिमा पुसण्यासाठी पार्थ व सुनेत्रा पवार सक्रीय झाले आहेत. यापूर्वी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ‘डिझाइन बॉक्स’ कंपनीच्या नरेश अरोरा यांनी राष्ट्रवादीसाठी रणनीतीकार म्हणून काम केले होते आणि प्रसिद्ध ‘गुलाबी थीम’ त्यांनीच आणली होती. परंतु, वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर मार्च 2026 मध्ये हे कंत्राट रद्द करण्यात आले.त्यानंतर आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना
रणनीतीकारपदी संधी मिळण्याचीं शक्यता आहे.

जानेवारी 2026 मध्ये अजित पवारांचे निधन झाल्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रशांत किशोर यांनी नुकतीच बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 19 हजार 324 मतांनी पराभव करत आमदार म्हणून विजय मिळवला आहे.
देशातील 12 मुख्यमंत्र्यांच्या विजयात रणनीतीकार म्हणून भूमिका बजावल्याचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी मे महिन्यातही मुंबईत पवार कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवारांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते; मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रशांत किशोर यांच्या साथीने नवीन डावपेच आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.







