पुणे : महाराष्ट्र राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या वर्गांसाठी तब्बल 30,209 शिक्षक/शिक्षण सेवक पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या टप्प्याला आता सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांना आपले पसंतीक्रम (Preferences) नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पसंतीक्रम नोंदणी व मुदत:

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025’ दिलेल्या पात्र उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आपले प्राधान्यक्रम जनरेट करणे आवश्यक आहे. हे पसंतीक्रम 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने लॉक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत संपल्यानंतर विनामुलाखत भरल्या जाणाऱ्या जागांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

परीक्षा व उमेदवारांचा प्रतिसाद:
ही ऑनलाईन परीक्षा 27 मे ते 5 जून या कालावधीत पार पडली होती. परीक्षेसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली, तर 1,70,108 उमेदवारांनी आपले स्व-प्रमाणपत्र यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.दरम्यान एकूण 30,209 जागांपैकी 19,881 पदे ही थेट गुणवत्तेच्या आधारे (मुलाखतीशिवाय) भरली जाणार आहेत, तर 10,328 पदांसाठी मुलाखत घेतली जाईल.
शाळांच्या प्रकारानुसार रिक्त पदे:
जिल्हा परिषद शाळा: 13,351, खाजगी शिक्षण संस्था: 12,148 आदिवासी विकास विभाग: 2,421, महानगरपालिका: 1,954
नगरपालिका / नगरपरिषदा: 280, शासकीय विद्यानिकेतन: 56
इयत्तेनुसार गटवारी:
इयत्ता 1 ली ते 5 वी: 14,320, इयत्ता 6 वी ते 8 वी: 10,012, इयत्ता 9 वी ते 10 वी: 5,513, इयत्ता 11 वी ते 12 वी: 364
भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांच्या काही अडचणी, प्रश्न किंवा सूचना असल्यास त्यांनी edupavitra25@gmail.com या अधिकृत ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






