लोणी काळभोर : हरविलेला मोबाईल परत मिळणे अनेकांसाठी अशक्यप्राय वाटत असताना, लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या सायबर सेलने आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १० हरविलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले. या मोबाईल फोनची एकूण किंमत ₹३ लाख ४० हजार इतकी आहे.

भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करून ही कारवाई करण्यात आली. हरविलेल्या अथवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक तांत्रिक पद्धतीने ट्रॅक करून त्यांचा मागोवा घेण्यात आला. लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी CEIR पोर्टलवर नोंदविलेल्या तक्रारींचे सखोल विश्लेषण करून सायबर सेलने विविध जिल्हे आणि राज्यांतील पोलीस यंत्रणांशी समन्वय साधत सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून सर्व १० मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.

हस्तगत केलेले मोबाईल संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या लोणी काळभोर पोलिसांच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-६) जीवन बेनिवाल तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार योगेश पाटील, महिला पोलीस अंमलदार उषा थोरात आणि महिला पोलीस अंमलदार कौशल्या शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, हरविलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी CEIR पोर्टल किती प्रभावी ठरू शकते, याचे हे आणखी एक यशस्वी उदाहरण मानले जात असून, नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तातडीने CEIR पोर्टलवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






