पुणे : अवैध गांजा विक्रीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या कोंढवा परिसरातील एका गुन्हेगारी टोळीवर कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 (मोक्का) अंतर्गत कारवाई करत मोठा दणका दिला आहे. या कारवाईमुळे परिसरातील संघटित गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणात टोळीप्रमुख रियाज अय्याज शेख (वय ३०) याच्यासह यास्मीन करीम शेख, आमिर समीर शेख, साबीया रियाज शेख आणि शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख या पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी रियाज अय्याज शेख आणि साबीया रियाज शेख हे सध्या पाहिजे आरोपी आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८(ब), २०(ब)(ii)(क) व २९ अन्वये गुन्हा नोंद असून, त्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) लागू करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित टोळीविरुद्ध कोंढवा तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यात अवैध गांजा विक्री, शरीराविरुद्धचे गुन्हे, दमदाटी, महिलांचा विनयभंग, गंभीर दुखापत अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही आरोपींनी गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. कोंढवा आणि स्वारगेट परिसरात या टोळीची दहशत निर्माण झाली होती.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत मंडले आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष चौधरी यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, सहायक पोलीस फौजदार शेखर कोळी, शरद वाकसे तसेच पोलीस अंमलदार एकोर्गे, चव्हाण, पळसे आणि माने यांनी आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचे पुरावे संकलित करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे वेळेत सादर केला. त्यानंतर या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाईला मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी संघटित अमली पदार्थ तस्करी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देत अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.






