पुणे : दिवाळी आणि छठ सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे विभागाने विशेष नियोजन केले आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी गर्दी आणि वेटिंग लिस्ट लक्षात घेऊन ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ७ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांच्या एकूण २१६ फेऱ्या होणार असून हडपसर, पुणे आणि कोल्हापूर येथून उत्तर भारतासह महाराष्ट्रातील विविध शहरांसाठी या गाड्या धावणार आहेत.

उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने गोरखपूर आणि गाझीपूर मार्गावर विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हडपसर-गोरखपूर दैनिक विशेष गाडीच्या सर्वाधिक ६४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी १६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान दररोज हडपसरहून धावेल. अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ, भोपाळ, कानपूर, लखनौ आणि गोंडा या ठिकाणी या गाडीला थांबे असतील.

हडपसर-गाझीपूर सिटी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी १३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवारी धावणार आहे. या गाडीच्या एकूण २४ फेऱ्या होणार आहेत.

नागपूर-हडपसर सुपरफास्ट विशेष गाडी ८ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान चालवण्यात येणार असून तिच्या २६ फेऱ्या होतील. याशिवाय नागपूर-हडपसर साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत.
पुणे-न्यू अमरावती विशेष गाडीच्या १२ फेऱ्या, कोल्हापूर-कलबुरगी विशेष गाडीच्या ६४ फेऱ्या आणि मुंबई-कोल्हापूर विशेष गाडीच्या १२ फेऱ्यांचा समावेश आहे.
रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. १४३१, ०१२०१ आणि ०१४१७ या गाड्यांचे बुकिंग २७ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. तर ०१२०९, ०१४१५, ०१४०३ आणि ०१४५१ या गाड्यांचे ऑनलाइन तसेच ऑफलाइन आरक्षण २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
प्रवाशांना IRCTC संकेतस्थळ किंवा रेल्वे तिकीट खिडकीवरून आरक्षण करता येणार आहे. सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांसाठी तिकिटे UTS ॲप किंवा तिकीट खिडकीवरून उपलब्ध होणार आहेत.







