रत्नागिरी : नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधीच एका तरुणाचा क्रिकेट खेळताना अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्मित नरेंद्र चवंडे (वय 35) असे या तरुणाचे नाव असून, ऐन लग्न ठरले असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील गाडीतळ परिसरातील लक्ष्मी चौक येथे रविवारी 18 ऑक्टोबरला ही घटना घडली. स्मित हा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळ सुरू असतानाच त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती स्मितचा भाऊ सुशांत याला दिली. त्याला तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विशेष म्हणजे स्मितचा विवाह नुकताच जमला होता. सोमवारी, 19 ऑक्टोबर रोजी मुलीकडची मंडळी त्याला भेटण्यासाठी घरी येणार होती. घरात लग्नाची तयारी आणि आनंदाचे वातावरण असतानाच आदल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे चवंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मूळचा रत्नागिरीतील चतंडेवठार येथील रहिवासी असलेला स्मित हा खंडाळा येथील अर्थन बँकेत नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन विवाहाच्या तोंडावर आणि तरुण वयातच त्याचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुन्न झाले आहेत.
या घटनेबाबत सुशांत चवंडे यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेळताना स्मितला अचानक चक्कर का आली आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.






