पुणे : लाचेची रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले आहे.दूध विक्री रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यामुळे दाखल झालेला खटला न्यायालयात न पाठविण्यासाठी आणि दंड न भरण्यासाठी पोलीस कर्मचारी महिलेने संबंधित व्यक्तीकडे दाेन हजार रूपयांची मागणी केली हाेती. मात्र तडजोडीअंती एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी (5 एप्रिल )पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर करण्यात आली.
रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच स्वीकारणा-या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे. नाईकरे या भाेसरी पाेलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली हाेती. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचा डेअरी व दूध विक्रीचा व्यवसाय आहे.डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. यामुळे तक्रारदार यांच्यावर भाेसरी पाेलीस ठाण्यात खटला दाखल झाला आहे. तो खटला न्यायालयात न पाठवता आणि कोणताही दंड न भरण्यासाठी पाेलीस शिपाई नाईकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे दाेन हजार रूपयांची मागणी केली हाेती. याबाबत डेअरी चालकाने ४ एप्रिलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नाईकरे यांनी भाेसरी पाेलीस ठाण्याच्या परिसरात तडजाेडीअंती एक हजार रूपयांची लाच स्वीकारली. ही रक्कम घेऊन पळून जात असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना पिंपरी न्यायालयाच्या बाहेरील रस्त्यावर पकडले. पाेलीस शिपाई नाईकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते.
दरम्यान या प्रकरणानंतर शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डाॅ. शीतल जानवे- खराडे, विजय चौधरी, उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल भोसले, पोलीस अंमलदार कोमल शेटे, अश्विन कुमकर, दीपक काकडे यांच्या पथकाने केली.