दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंद थिएटरजवळ गाळ्यात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी 4 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी (ता. 26) हिंद थिएटरच्या जवळ आतार फोटो स्टुडिओ खालील एका दुकानाच्या गाळ्यात ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच दौंड व परिसरातील अवैध व्यवसायाला चाप बसला पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख (वय – 32, रा. खाटीकगल्ली ता. दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अमीर जिलाणी शेख यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गस्त घालीत असताना दौंड गावच्या हद्दीत हिंद थिएटरच्या जवळ आतार फोटो स्टुडिओ खालील एका दुकानाच्या गाळ्यामध्ये मोनेद्दीन उर्फ मोन्या शेख हा लोकांना घेऊन स्वत:च्या फायद्याकरीता मोबाईल वर फन ट्र टाग्रेट नावाचा जुगार खेळत व खेळवित आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
सदर ठिकाणी पोलीस दाखल झाले असता पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणावरून पळून जाण्यात तो यशस्वी झाला. तसेच त्या ठिकाणी असलेल्या एका इसमाकडून मोबाईल फोन, जुगाराचा माल असा 4 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानुसार मोनेद्दीन उर्फ मोन्या फरीद शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.