पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर 9 एप्रिल ते 31 मे 2026 या काळात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भीमाशंकर मंदिर परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. विशेषतः नवीन सभामंडपाचे बांधकाम, पायरी मार्गाचे नूतनीकरण आणि मंदिर परिसराचे सुशोभीकरण वेगाने सुरू आहे. भाविकांची गर्दी झाल्यास अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी 53 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी 2027 चा नाशिक कुंभमेळा हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. कुंभमेळ्याच्या काळात जगभरातून लाखो भाविक भीमाशंकरला दर्शनासाठी येतात. त्यावेळची अलोट गर्दी हाताळण्यासाठी मंदिराची क्षमता वाढवणे आणि पायाभूत सुविधा भक्कम करणे आवश्यक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
मंदिर 9 एप्रिल ते 31 मे 2026 पर्यंत पूर्णपणे बंद असेल. 1 जून 2026 पासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. या काळात भीमाशंकर परिसरात पर्यटनासाठी किंवा दर्शनासाठी जाणे टाळावे, कारण मुख्य मंदिर गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नाही.







