पुणे : पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यानुसार येत्या दोन एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी दोन दिवसापूर्वीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या आमदारकीला महाविकास आघाडीच्या सुलक्षणा शीलवंत- धर यांनी आव्हान दिले आहे.बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून आरोप केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांची ओळख आहे.अण्णा बनसोडे हे तब्बल तीन वेळा पिंपरीचे आमदार झाले आहे. ही त्यांची तिसरी टर्म आहे. तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, जादा इच्छूक आणि मंत्रिपदे कमी यामुळे महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदं मिळालं नाही. मात्र, अजित पवारांनी त्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षपदी संधी दिली आहे. मात्र आता त्यांच्या आमदारकीला आव्हान दिल असल्यामुळे त्यांचे आमदारकी राहणार की जाणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.