पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने थकीत मिळकत धारकांबाबत कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून तब्बल 800 कोटींचा मालमत्ताकर वसूल करण्यात आला आहे. मात्र येत्या 31 मार्चपर्यंत 200 कोटी रुपये वसुलीचे आव्हान या विभागासमोर आहे.त्या दृष्टीने विभागाने नियोजन केले असून, अधिकार्यांसह कर्मचार्यांना वसुलीचे टार्गेट दिले आहे. एक हजार कोटींचे टार्गेट कर संकलन विभाग पूर्ण करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कर संकलन विभागाने थकबाकीदार कंपन्या, कारखाने, शॉपींग मॉल, पेट्रोल पंप, रूग्णालय, शाळा, महाविद्यालय, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल तसेच, निवासी मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर थकबाकीदार बिल भरत आहेत. त्या मालमत्तेचे सील काढण्यात येत आहे. तसेच, 50 हजार व त्या पेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्तांकडून वसुली मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
आतापर्यंत एकूण 4 लाख 78 हजार 658 मालमत्ता धारकांनी 800 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. कर संकलन विभागास 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षात 1000 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. त्यामुळे उर्वरित दिवसात त्या विभागास तब्बल 200 कोटींच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम तीव्र करावी लागणार आहे.त्या दृष्टीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वसुलीचे लक्ष दिले आहे.