पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरात विशेष मोहीम राबवत अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात वाढदिवस आणि जयंतीनिमित्त बॅनरबाजी करण्यात येते. याप्रकरणी आता महापालिकेने कठोर पावले उचलत शहरातील पाच आमदार आणि एका खासदाराला नोटीस देत अनाधिकृत फलक उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना समज देण्याच्या सूचना केल्या आहेत.
पिंपरी शहरातील चौकामध्ये सर्व नियम धाब्यावर बसवत कार्यकर्त्यांच्याकडून अनधिकृत फलक बसवण्यात आले. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. शहरात उभारलेल्या अनाधिकृत फलकावर कारवाई करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाचे पथक गेल्यास त्यांना दमदाटी करणे तसेच धमकावण्याच्या घटना देखील घडल्या.याची गंभीर दखल घेत महापालिकेने शहरातील पाच आमदार आणि एका खासदाराला नोटीसा पाठवल्या आहेत.
गेल्या काही दिवसापासून शहरात वाढदिवस, महापुरुषांची जयंती तथा पुण्यतिथी तसेच विविध सण उत्सवाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.