उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर सहजपूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत पंक्चर काढून पिकअप टेम्पोत बसण्यासाठी निघालेल्या चालकाला भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सहजपूर फाट्यावर आज शुक्रवारी (ता. 03) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
बाळू पोपट सांगळे (वय – 45, रा, करेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्या पिकअप चालकाचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर सदरचा टेम्पोचालक हा पळून गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर बाजूकडून बाळू सांगळे हे पुण्यातील मार्केटला कांदे घेऊन निघाले होते. यावेळी पहाटेच्या वेळेस पिकअप पंक्चर झाल्याने त्यांनी गाडी बाजूला घेऊन पंक्चर काढून घेतली. याचवेळी यावेळी सोलापूरच्या बाजूकडून भरधाव टेम्पोचालकाने पिकअप चालकाला जोरदार धडक दिली.
दरम्यान, यावेळी टेम्पोचालक न थांबता त्या ठिकाणावरून पळून गेला. अपघात झाल्यानंतर पळून जाताना एका चारचाकी गाडीला घासून पुढे निघून गेला. सदर टेम्पोचालकाला उरुळी कांचन येथील कदम रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच बाळू सांगळे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.