Pune news : वाघोली( पुणे ) : गेली अनेक दिवसांपासून दुर्गंधीयुक्त सांडपाणी केसनंद राज्य मार्गाने वाहत आहे. नागरिकांनी सातत्याने मागणी करुन देखील याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे जेजे नगर व परिसरातील संतप्त नागरिकांनी मनसेचे अॅड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली वाघोली येथील मनपा संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, येथे अधिकारीच उपस्थित नसल्याने अधिक्षकांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांनी गांधीगिरी केली.
या वेळी नागरिकांनी कायालर्यामध्ये ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत पाणी बंद न झाल्यास दुर्गंधीयुक्त पाण्याने अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा इशारा देखील या वेळी नागरिकांनी दिला. सांडपाणी वाहिनीचे पाणी केसनंद फाटा येथील मैदानात उघड्यावर सोडले असून, ते पाणी केसनंद रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहत आहे. रोडवर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अनके दुचाकीस्वार खड्ड्यांमध्ये पडून अपघात झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरियाची साथ सध्या सुरू आहे. असे असताना सांडपाणी वाहिनीच्या पाण्यामुळे या आजारांमध्ये भर पडली आहे. महापालिकेचे अधिकारी व पीडब्ल्यूडीचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत बोलताना ‘पीएमसी’च्या कनिष्ठ अभियंता रुपाली वाळके म्हणाल्या की, तो आमचा विषय नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रश्न आहे. त्यांना याबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे.