मुंबई : पवई भागात चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हिरानंदानी गार्डनच्या पवई प्लाझा इमारतीमधील एका स्पामध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईत एका 18 वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली असून तिला महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी सत्यता पडताळण्यासाठी एक बनावट ग्राहक त्या स्पामध्ये पाठवला. ठरलेल्या बेतकानुसार तो ग्राहक स्पामध्ये पोहोचला आणि त्याची भेट तेथील व्यवस्थापक भारती नावाच्या महिलेशी झाली. ग्राहकाने उपचारांबद्दल विचारणा केली असता, तिने मसाजसाठी 2 हजार रुपये आणि इतर शारीरिक संबंधांसाठी 3 हजार रुपये अशी किंमत सांगितली. त्यानंतर व्यवस्थापकाने एका तरुणीला त्या ग्राहकासोबत खोलीत पाठवले.
आधीच ठरलेल्या संकतेनुसार त्या बनावट ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर पवई पोलिसांनी तात्काळ स्पामध्ये धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पीडित तरुणीला सुरक्षित बाहेर काढले आणि घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले.

याप्रकरणी पोलिसांनी स्पाची व्यवस्थापक भारती हिच्या विरोधात संबंधित कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. परिसरामध्ये असे अनधिकृत आणि बेकायदेशीर धंदे चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे पवई परिसरातील अशा अवैध व्यवसायांना मोठा आळा बसेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.







