पुणे, ता. 19 : पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नऊ महिने उलटले तरी अद्याप नियुक्त्या देण्यात आल्या नाहीत. राज्यभरातील वंचित उमेदवारांना आस्थापना बदलून नियुक्तीच्या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शनिवारी (ता. 21) पासून बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असून या आंदोलनाला राज्यभरातून शेकडो उमेदवार उपस्थित राहणार असल्याची माहिती पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून देण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक 25 फेब्रुवारी, 2024 रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. सदर गुणवत्ता निवड यादीमध्ये 645 आणि रूपांतरीत यादीत 156 अशा रयत शिक्षण संस्थेमध्ये एकूण 801 उमेदवारांची विना मुलाखत शिफारस झाली. पण नऊ महिने उलटले, तरी शिफारस पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी व नियुक्तीची कोणतीच सूचना देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी सुरू केलेल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात 11 हजार 85 शिक्षक उमेदवारांची विना मुलाखत निवड यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यातील बहुतांश शिक्षकांना राज्यातील जिल्हा परिषदा व इतर संबंधित आस्थापनांनी नियुक्त्या दिल्या. मात्र, उच्च गुण असूनसुद्धा रयत शिक्षण संस्थेत निवड झालेले शिक्षक आजतागायत नियुक्तीपासून वंचित आहेत. शिक्षक पदभरती 2022 बाबत प्रशासनाकडून निर्देश प्राप्त आहेत.
वंचित उमेदवारांनी ऑगस्ट महिन्यात सलग सोळा दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले. पण मागण्या मान्य न झाल्याने दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2024 सलग पाच दिवस अन्नत्याग उपोषण केले. सदर उपोषणाची दखल घेऊन आस्थापना बदलून नियुक्ती देण्यासंबंधी लेखी पत्र देण्यात आले. परंतु, तीन महिने उलटून गेले तरी त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दरम्यान, 3 डिसेंबर, 2024 पासून मागणी मान्य न झाल्याने वंचीत उमेदवार शिक्षण आयुक्त कार्यालय येथे तिसऱ्यांदा धरणे आंदोलनास बसले आहेत. सदर 801 कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) जवळपास पंचवीस हजार विद्यार्थ्याचा शिक्षण हक्क धोक्यात आहे. सदर उमेदवारांना आस्थापना बदलून तात्काळ नियुक्ती दिल्यास संबंधित विद्यार्थी अन् शिक्षकांना न्याय मिळेल, या आंदोलकांकडून अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वंचित उमेदवारांना आस्थापना बदलून नियुक्ती देण्यात यावी, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास वंचित उमेदवारांना नाईलाजास्तव धरणे आंदोलनासोबत 21 डिसेंबर, 2024 पासून अन्नत्याग उपोषण करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत निवड होऊन नऊ महिन्याचा कालावधी उलटला, तरी नियुक्ती मिळाली नाही. वंचित उमेदवारांनी ऑगस्ट महिन्यात सलग सोळा दिवस बेमुदत धरणे आंदोलन केले. तरीही मागण्या मान्य न झाल्याने सलग पाच दिवस अन्नत्याग उपोषण केले. सदर उपोषणाची दखल घेऊन आस्थापना बदलून नियुक्ती देण्यासंबंधी लेखी पत्र देण्यात आले. परंतु, मंत्रालयात प्रस्ताव पाठवून दोन महिने उलटले, तरी अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. येत्या 21 डिसेंबर 2024 पासून आमरण अन्नत्याग उपोषण करणार आहे.
-नितीन जाधव, रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेले शिक्षक