पुणे : पुण्यातील ससून रुग्णालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा काविळ झाली असल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाने पलायन केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळी वार्डाची सफाई करण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना थोडा वेळ बाहेर जाण्यास सांगितले. याची संधी साधून सदर रुग्ण हा पळून गेला आहे. विठ्ठल बापूराव ढवळे (वय-३५) असे या रुग्णाचे नाव आहे. याबाबत रुग्णाच्या पत्नीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं काय घडल?
ससून रुग्णालयात उषा ढवळे यांनी त्यांचे पती विठ्ठल ढवळे यांना उपचारासाठी २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दाखल केले होते. कावीळ तसेच फिट येण्याचा त्रास त्यांना होत असल्याने वार्ड नं ४० आपत्कालिन विभाग येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी वार्ड नं ३ मध्ये पुढील उपचाराकरीता दाखल केले होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वॉर्डमधील साफ सफाईसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले.
यावेळी उषा ढवळे देखील वॉर्डच्या बाहेर येवून थांबल्या होत्या. त्यानंतर साधारण १० वाजण्याच्या सुमारास उषा ढवळे या वॉर्डात गेल्या असता तेथे त्यांचे पती विठ्ठल ढवळे हे त्यांना दिसले नाही. यानंतर त्यांनी संपुर्ण ससून हॉस्पीटल परिसर तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता त्यांचे पती त्यांना आढळून आले नाही.
ससून रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष
याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाला सांगितले असता याकडे दुर्लक्ष केलं. कोणीही लक्ष न दिल्याने अखेर चार दिवसांनंतर उषा ढवळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन पती विठ्ठल बापुराव ढवळे हे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.