पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पाचे उद्घाटन केलं होतं. पुणेकरांसाठी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम ही वेगाने सुरू होणार आहे.मात्र मागील तीन महिन्यापासून प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. जानेवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात सर्वात जास्त तब्बल पाच लाख प्रवासी घटले आहेत. याचा परिणाम तिकीट उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांची मेट्रोची क्रेझ संपली की काय?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊन संपूर्ण 33 किलोमीटर मार्गावर मेट्रोसेवा सुरू झाली असली तरी अपेक्षित वेगाने प्रवासी संख्या वाढताना दिसत नाही. मंडई,स्वारगेट ही स्थानके सुरू झाल्यानंतर दररोज प्रवासी संख्या दोन लाखाच्या पुढे पोहोचणे अपेक्षित असताना अद्याप सरासरी प्रवास संख्या 1 लाख 60 हजारांच्या दरम्यान आहे त्यामुळे आता पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली असल्याच दिसून येत आहे. गेल्या मार्च महिन्यात तब्बल पाच लाख प्रवासी घटले असून याचा उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान प्रवाशांना मेट्रोस्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी पुणे मेट्रोने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
गेल्या चार महिन्यातील पुणे मेट्रोची प्रवासी संख्या आणि उत्पन्न जाणून घेऊया..
डिसेंबर 2024 महिन्यात प्रवाशांची संख्या 46 लाख 94 हजार 147 इतकी होती. तर 7 कोटी 38 लाख उत्पन्न.जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 49 लाख 64 हजार 224 आणि उत्पन्न 7 कोटी 87 लाख होते. तर फेब्रुवारी महिन्यात 43 लाख 7000 प्रवासी होते तर 7 कोटी 73 लाख उत्पन्न होते. तर गेल्या मार्चमध्ये 44 लाख 81 हजार 613 प्रवासी तर 7 कोटी 1 लाख इतके उत्पन्न मिळाले.