लहू चव्हाण
पाचगणी : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये पाचगणी गिरिस्थान नगरपरिषने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मान्यवरांचा उपस्थित हा पुरस्कार पांचगणी पालिकेला प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रूचेश जयवांशी, पाचगणी नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
१ लाख लोकसंख्येखालील सर्वात स्वच्छ शहर म्हणून हा पुरस्कार पाचगणी नगरपरिषदेला प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा चालू असतानाच शहरात पालिका कर्मचाऱ्यांनी चौकातील छ्त्रपती शिवाजी महाराज आणि गार्डन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांचा निनादात फटाक्याची आतषबाजी करीत अक्षरशः नाचत आनंदोत्सव साजरा केला.
देशभर आजादीचा अमृत महोत्सव साजरा होत असताना याच कालावधीत पांचगणी पालिकेची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड होणे हा एक प्रकारचा वेगळा गौरव म्हणावा लागेल. पाचगणी मध्ये स्वच्छतेच्या कामात सुरुवातीचे पायाभरणीचे काम नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून झाले.
परंतु प्रशासकीय कालावधीत सुध्दा मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी तो आलेख कायम ठेवला किंबहुना चढता- वाढता ठेवला त्यामुळे पाचगणीच्या स्वच्छतेचा डंका देशात वाजू लागला आणि कायम राहिला याचे श्रेय प्रशासक गिरीश दापकेकर यांना द्यायलाच हवे. या पुरस्कार वितरण प्रसंगी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक गणेश कासुर्डे, पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, शहर समन्वयक ओंकार ढोले यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमात उपस्थितांना पांचगणीच्या स्वच्छतेविषयी दाखविण्यात आलेल्या चित्रफितिचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. शहरातील स्वच्छता व सौंदर्यकरणावर दिलेला भर, मुख्याधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी झोकून दिलेले काम त्याचबरोबर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पाचगणी नगरपालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
हा पुरस्कार आमचा नसून माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पालिका कर्मचारी व पांचगणी करांचा असल्याचे यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी सांगितले. तर पांचगणीकर नागरिकांनी पालिकेला स्वच्छतेत सातत्यपूर्ण पणे सहकार्य केल्याने आम्ही पाच वर्षात तिसऱ्यांदा पुरस्कार प्राप्त करू शकलो. या पुरस्काराने देशभरात पांचगनीने नावलौकिक प्राप्त केला आहे. हा पुरस्कार जितका पालिकेचा आहे तितकाच सर्व पांचगणी करांचा असल्याचे माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी सांगितले.