Pachgani News : पाचगणी, (सातारा) : खरिप हंगाम २०२३-२४ ई- पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून आपल्या शेतातील पिक ७/१२ ला स्वतः नोंदवावे असे प्रतिपादन महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी केले. (Pachgani News)
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील जे.पी मेनलबेन मेहता कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ई- पीक पाहणी नोंदणीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार पाटील बोलत होत्या.
यावेळी प्राचार्य उत्तम गलांडे, ज्यूनिअर विभाग प्रमुख भारती पवार, शिक्षक बाळासाहेब राऊत, भगवानसिंग राजपूत, मंगल भिवरकर, शैलजा पाटील, रेखा वाडकर, प्रिया गुळुमकर, प्रविण कदम, संतोष गाडे, पाचगणी मंडलाधिकारी चंद्रकांत पारवे, तलाठी दिपक पाटील, अविनाश शेडोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Pachgani News)
यापुढे बोलताना तहसीलदार पाटील म्हणाल्या, “खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलैपासून सुरु करण्यात आले आहे. शेतकरी बंधू-भगिनींना खरीप हंगामा २०२३-२४ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून शाळेत जाऊन शेतकऱ्यांच्या मुलांना प्रशिक्षण देणे सुरू आहे.”
प्रास्ताविक उत्तम गलांडे यांनी तर बाळासाहेब राऊत यांनी आभार मानले. (Pachgani News)