लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी, (सातारा) : लोकांमध्ये सापांची खूप भीती असते. साप चावतील या भीतीने त्यांची हत्या होत असते. अशा वेळी सापाला न मारता आणि घाबरून न जाता परिसरातील सर्पमित्राला संपर्क साधा, असे आवाहन वाई येथील वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ॲन्ड रिसर्च असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश पवार यांनी केले आहे. Pachgani News
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून पाचगणी रोटारॅक्ट क्लबच्या वतीने सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी सर्प जागृत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. Pachgani Newsv
यावेळी वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ॲन्ड रिसर्च असोसिएशनचे सचिन पेटकर, ॲनिमल रेस्क्यू टीमच्या अमृता पोरे, सीमा समेल, सायली कदम, डॉ. पूनम थोपटे, स्वेता बगाडे, अबदा बागवान, राजीव बोरा, राजेंद्र गायकवाड, प्रणव बोरा आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना अंकुश पवार म्हणाले दिवसेंदिवस सापांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्याने पर्यावरण संवर्धन धोक्यात येत आहे. परंतु पाचगणी परिसरात अनेक नागरिक साप निघाल्यानंतर तत्काळ सर्पमित्रांना फोन करून बोलावीत असल्यामुळे अनेक सापांना जीवदान मिळत आहे.
निहाल बागवान यांनी उपस्थितांना सापांविषयी माहिती दिली. यावेळी पाचगणी व परिसरात साप संवर्धनासाठी मेहनत घेणाऱ्या सर्पमित्र अक्षय गायकवाड, रोहित चव्हाण, शंकर आब्रांळे, अनिल पवार, सिध्दांत कांबळे यांना तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले. निखिल थोपटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. योगेश गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्निल परदेशी यांनी सापांना वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रोटरॅक्ट सदस्यांचे कौतुक केले.
दरम्यान, सर्पदंश झाल्यावर काय करावे व काय करू नये याविषयी माहिती देण्यात आली. विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड कॉलेजचे मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे व रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष ओमकार भगत यांनी आभार मानले. Pachgani News