लहू चव्हाण
(Pachgani News) पाचगणी : भोसे (ता.महाबळेश्वर) येथील स.नं. २९ व ३० मिळकतीमधील देवस्थान जमिनीवरील अनाधिकृत बांधकामांवर सुरू असलेली वीज तोडणी तत्काळ थांबवणे बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव विक्रम पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, शहराध्यक्ष शेखर भिलारे, सरचिटणीस सचिन घाटगे, श्रीहरी गोळे, किरण भिलारे, हर्ष भिलारे आदी उपस्थित होते.
महाबळेश्वर पाचगणी प्रदेशासाठी या कालावधीमध्ये प्रादेशिक योजना लागू…!
केंद्र सरकारच्या आदेशानुसार १७ जानेवारी २००१ च्या राजपत्रानुसार महाबळेश्वर तालुका पर्यटनदृष्ट्या संवेदनशीन म्हणून जाहीर केला आहे. महाबळेश्वर पाचगणी प्रदेशासाठी सन 2002 ते 2022 या कालावधीमध्ये प्रादेशिक योजना लागू करण्यात आले असून त्यानंतर 2002 पासून महाबळेश्वर तालुक्यासाठी इको सेन्सिटिक झोन केंद्र शासनाने लागू केला आहे. यामधील तरतुदीनुसार महाबलेश्वर तालुक्यातील शेत जमिनीचा वापर शेती व्यतिरिक्त बिगर शेती करण्यासाठी या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असतानाही महाबळेश्वर तालुक्यातील विनापरवाना बांधकाम केलेले आहे, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 में कलम कलम 45 अन्वये आदेश पारित करण्यात आलेले असूनही सदर आदेशानुसार एकाही प्रकरणात अनधिकृत बाधकाम संबंधित मिळकतधारक यांनी सदरचे बांधकाम मुदतीत काढून टाकलेले दिसून येत नाही, असे सांगण्यात आलेले आहे.
तरी महाबळेश्वर तालुक्याचा रीजनल प्लॅन 2002 साली अस्तित्वात आला त्याची मुदत 2022 पर्यंत होती. महाबळेश्वर नागरिकांचा रीजनल प्लॅन शासनाकडे कित्येक वर्षापासून अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आज तालुक्यात कित्येक गावांना गावठाणच नाही. मग अशा परिस्थितीत भूमिपुत्र राहणार कुठे? महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने येथे शेती कमी प्रमाणात होते. त्यामुळे येथील भूमिपुत्र पर्यटनावर अवलंबून असतात.
काही भूमिपुत्र न्याहारी निवास अंतर्गत उदरनिर्वाह चालवत आहेत. अशा बांधकामावर शासनाने कारवाई केल्यास तालुक्यातील जनतेवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने गावठाण वाढीच्या निकषाची निश्चिती करुनच अवैध बांधकामावर कारवाई करावी. असे निवेदन नमूद केले आहे. हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनाही देण्यात आले आहे.