उरुळी कांचन, (पुणे) : कृषी विभागामार्फत येत्या ६ ऑक्टोबर रोजी बालेवाडी (पुणे) येथे नैसर्गिक शेती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे.
या कार्यशाळेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीला देशात प्रोत्साहन देणे, रासायनिक खतांच्या मुख्यतः युरीयाचा वापर कमी करणे यावर भर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. या दृष्टीने गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसार याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
आचार्य देवव्रत यांनी कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाची सुमारे २०० एकर शेती पुर्णत: नैसर्गिक शेतीमध्ये कशी परीवर्तीत केली आणि भविष्यात हा शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो याबद्दल त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेस राज्यभरातून दोन हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत. दुपारील तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच राज्यातील नैसर्गिक शेती करणाऱ्याच्या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहे. येथे नैसर्गिक शेतीसंदर्भात एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले सेवार्थ महाराष्ट्र आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच सदर कार्यक्रमामध्ये सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन होणार आहे. जे शेतकरी उपस्थित राहण्यास इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड त्वरित कृषी सहायक यांना पाठवावेत असे आवाहनहि करण्यात आले आहे.