राहुलकुमार अवचट
यवत : शेतकऱ्यांना एकाच वेळी व एकाच जागी कृषी, कृषी औजारे, विविध बियाणे, ऑटोमोबाईल, गृह उपयोगी वस्तू, नवीन तंत्रज्ञान, लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने, महिला बचत गट गृहोपयोगी वस्तूचे प्रदर्शन इ. क्षेत्राशी निगडित आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती मिळावी या उद्देशाने दौंड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या महोत्सवाचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या प्रयत्नाने व शिवसेना शाखा यवत यांच्या वतीने प्रथमच दि.१४ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दरम्यान कृषी महोत्सवाचे यवत काळभैरवनाथ मंदिर शेजारील बाजार मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील दालने व १५० हून अधिक उद्योगांचा सहभाग या महोत्सवात आहे.
शेती व इतर क्षेत्रातील उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी व इतर वर्गांना असणे गरजेचे आहे ही गरज लक्षात घेता ग्रामीण भागात प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांच्या प्रयत्नाने दौंड तालुक्यातील सर्व शेतकरी यांच्या करीता यवत या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे बैलांचा ‘रॅम्पशो’ गुरुवार दि.१७ रोजी आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होईल त्या प्रत्येकास प्रमाणपत्र व प्रथम तीन विजेत्यांना दौंडचा राजा या नावाने चषक देण्यात येईल.
याबरोबरच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन प्रत्येक रक्तदात्यास स्व. बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे शिवसेना शाखा यवत आयोजकांनी सांगितले.