मुंबई : देशभरातून असे अनेकजण न सांगता घरातून पडून मुंबईला येतात. काहीजण लहान मुलांना मुंबईत आणून कामाला लावतात. कामधंदा न मिळालेली मुले पळून येऊन धार्मिक स्थळे, सिग्नलवर भीक मागताना दिसून येतात. घरच्याना मात्र ती नेमकी कुठे आहेत, याची माहिती नसते. या सर्व घटना पाहता मुलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने ‘ऑपरेशन री-युनाइट’ राबविण्यात आले होते.
दीड महिना सुरु असलेल्या या विशेष मोहिमेमध्ये ४८७ मुलांना शोधण्यात मुंबई पोलीसांना यश मिळाले आहे. या शोधलेल्या मुलांमध्ये २५७ मुली तर २३० मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी या मोहिमेत बेपत्ता, अपहरण झाल्याची नोंद असलेल्या ६० मुले आणि १३५ मुलींना शोधून काढले.
तसेच ‘ऑपरेशन री-युनाइट’मध्ये सापडलेल्या १५४ मुले आणि १२२ मुलींची कुठेच कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती कारवाईतून समोर आली आहे. अल्पवयीन असतानाही कामाला जुंपलेल्या आठ बालकामगारांची सुटका देखील करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक पोलिसांच्या बरोबरीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील या मोहिमेत हिरीरीने सहभाग घेतला. यामुळेच या मुलांची सुटका होवू शकली.