पुणे : जी २० परिषदेच्या निमित्ताने जानेवारी १५ आणि १६ रोजी होणार्या बैठकीसाठी सुशोभिकरण व दुरूस्तींची कामे ५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील. असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे.
तसेच परदेशी पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आगा खान पॅलेस, शनिवारवाडा आणि पुरंदर तालुक्यातील दिवे गावाजवळील जाधवगढी या ऐतिहासिक स्थळांना भेटीचे देखिल नियोजन करण्यात आले आहे. या भेटी दरम्यान विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन ते तीन दिवस या मार्गावरील मेट्रोचे काम बंद ठेवण्याबाबत मेट्रो प्रशासनासोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन देखील यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहे.
बैठकीतील चर्चेविषयी माहिती देताना विक्रम कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, पारंपारिक नृत्य आदी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. पुण्याचे ब्रँडींग करण्यासाठी पर्यटन विभागाकडून माहिती पट तयार करण्यात येत आहे.
गोल्फ क्लब येथील उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये असून ५ जानेवारीपर्यंत या पुलाचे काम पुर्ण झालेेले असेल. पाहुण्यांच्या शनिवार वाडा भेटीदरम्यान लाईट ऍन्ड साउंंड शोचेही आयोजन करण्यात येणार आहे.
या बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अंकित गोयल आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.