राहुल कुमार अवचट
यवत : कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षं साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव यावर्षी भव्य स्वरूपात सहारा करण्यात येत आहे. यवत येथील श्रीकाळभैरवनाथ जन्मोत्सवनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह भव्य सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात येणार असुन सोहळ्याचे हे ५५ वे वर्ष आहे.
यानिमित्ताने मंदिराच्या आवारात भव्य मंडप घालण्यात आला असून भव्य व आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यवत पंचक्रोशीतील नागरिकांसाठी हे सात दिवस सुवर्ण पर्वणीचा काळ असतो. यावेळी यवत गावामध्ये सात दिवस अतिशय भक्तिमय, आनंदी, उत्साही वातावरण निर्माण झालेले असते.
रोज पहाटे काकड आरती, अभिषेक, देवाला पोशाख, पूजा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ असा दिनक्रम असतो. रोज दुपारी व संध्याकाळी यवत व पंचक्रोशीतील भाविकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.
रोज रात्री नऊ ते अकरा नामवंत कीर्तनकारांचा सुश्राव्य कीर्तन व रात्री पंचक्रोशीतील भजनी मंडळींचा हरिजागर आदि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे
गुरुवार दि. १६ रोजी रात्री बारा वाजता श्री काळभैरवनाथ महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.