पुणे : दिवाळी सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, कोरोन काळात दोन वर्ष हा सण सर्वसामान्य नागरिकांना धुमधडाक्यात साजरा करता आला नाही. यावर्षी दिवाळी सण धुमधडाक्यात साजरा करणाऱ्यांच्या अपेक्षेवर महागाईमुळे पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे.
तसेच दिवाळीत खाद्यतेलांच्या मागणीत मोठी वाढ होत असते. मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या १५ किलो डब्यांच्या दरात १०० ते १५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, सूर्यफूल तेलाच्या १५ किलो डब्याच्या दरात ५०० ते ७०० रुपयांनी घट झाली होती. मात्र आता सूर्यफूल तेलाच्य डब्यामागे देखील १५० ते २०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्यामागे १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर, सरकी तेलाच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली असून शेंगदाणा तेलाचे दर मात्र स्थिर आहेत. पाम तेलाचे दरही वाढले आहेत. वनस्पती तुपाच्या दरात किलोमागे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. यावर्षी सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी सणात महागाईचा मोठा दणका बसणार आहे.