दीपक खिलारे
इंदापूर : कोणतीही परवानगी न घेता करण्यात आलेल्या बांधकामावर इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई केली असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली. यावेळी जेसीबीच्या मदतीने अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
तहसीलदार श्रीकांत पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूरचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह इतर ३ पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक आणि १५० पोलीस कर्मचारी यांसह नगरपरिषदेची यंत्रणा आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.
यातील काही बांधकामांना स्थानिकांनी विरोध केला असल्याने या कारवाईत काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. तसेच या कारवाईसाठी शहरात देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुरेशी मोहल्ल्यानंतर पुढची कारवाई कुठे ?
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील कुरेशी मोहल्ल्यातील अनाधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवताना कारवाई केली. मात्र, शहरात इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. त्यामुले पुढची कारवाई नगरपरिषद कुठे करणार ? कारवाई करून येथील नागरिकांना दिलासा देणार का ? या प्रश्नावर दिवसभर अनेक ठिकाणी चर्चा रंगल्या होत्या.