NIA Raid:मुंबई : राष्ट्रीय तपास एजन्सी आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून राज्यभरात ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.यामध्ये घाटकोपर ट्रेन ब्लास्टमधील साकीब नाचन आणि त्याचा मुलगा शामिन नाचन या दोघांना ताब्यत घेण्यात आलं आहे. त्याशिवाय १५ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर कटातील अन्य साथीदारांकडून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. यामुळं ही एनआयएची मोठी कामगिरी समजली जात आहे. त्याशिवाय कर्नाटकात एका ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
दोन बाईक चोरांना अटक
या कारवाईत इसिसचं नेटवर्क नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुंबई-पुण्यात दोन बाईक चोरांना अटक करण्यात आली होती. यातून इसिसच्या नेटवर्कबाबत खुलासा झाला होता, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडं देण्यात आलं होतं. आज पहाटेपासून मुंबई-पुण्यासह, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भायंदर तसेच कर्नाटकात एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. यामध्ये कर्नाटकातून १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भायंदरमध्ये १ अशा ४४ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. तसेच यामध्ये १५ हून अधिक संशयीत दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या कारवाईत बॉम्बस्फोटांसाठी लागणारं साहित्य, कागदपत्रे, बेहिशोबी रोकड, बंदूक, इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळं स्फोटाचा मोठा कटही उधळण्यात आला आहे. या सर्व संशयीत आरोपींना मुंबईतील पेडर रोड इथल्या एनआयएच्या कार्यालयात आणण्यात येणार आहे.