पुणे : चैत्र पौर्णिमेच्या लोणी काळभोर गावच्या यात्रेनिमित्ताने समृद्धी प्रोडक्शन या युट्युब चॅनलवर समस्त लोणी काळभोर व कदमवाक वस्ती गावच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथ देवस्थानावर अतिशय सुंदर गीत नुकतेच रिलीज झाले.
ग्रामीण भागातील कुंजीरवाडी इथे राहणाऱ्या एक आदर्श शिक्षिका सौ करुणा सुखदेव कंद/वाळके यांनी निर्मिती व गीत लेखन केले आहे.
सुप्रसिद्ध संगीतकार चंदन कांबळे यांचे संगीत व विकास साळवे यांचा मधूर आवाज असलेले हे गीत चांगलेच लोकप्रिय होत आहे.
चिंतामणी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी 31 वर्ष सेवा केली आहे.आपले काम प्रामाणिकपणे करत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.मुलांमध्ये त्या खूप लोकप्रिय आहेत. त्यांनी नुकतीच 2024 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देताना आपण समाजाला काहीतरी चांगले द्यावे या हेतूने त्या लेखनाकडे वळल्या आणि त्यातून सुरू झाला गीत लेखनाचा प्रवास.
संगीत किंवा गाण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड म्हणून साधारण दीड वर्षांपूर्वी त्यांनी युट्युबवर स्वतःचे समृद्धी प्रोडक्शन नावाने चॅनल सुरू केले. आजपर्यंतच्या गीत लेखनाच्या या प्रवासात काही अडचणी आल्या परंतु त्या सर्वावर मात करून जिद्दीने त्यांनी लेखनाचा प्रवास चालू ठेवला.सोशल मीडियावर आता सध्या वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स गाणी आपण पाहत व ऐकत असतो. त्याचा कळत नकळत तरुण पिढीवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. म्हणूनच शब्द हे शस्त्र आहे ते अतिशय जपून वापरले पाहिजे हा हेतू ठेवून आपण समाजाला चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे.विविध सामाजिक कार्यामध्येही त्या सदैव सक्रिय असतात.
समृद्धी प्रोडक्शन या त्यांच्या युट्युब चॅनेलवर आत्तापर्यंत दहा गाणी आली आहेत. त्यांचे सहज साधे सोपे शब्द मनाला भुरळ घालतात.
समाजामध्ये निर्माण झालेली वैचारिक तेढ दूर व्हावी आणि एकोपा वाढवा,तरुण पिढीला चांगला संदेश जावा या दृष्टीने त्यांच्या लेखनामध्ये व्यक्त होण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रयत्न सर्व थरावर यशस्वी ही होत आहे. त्यांच्या यशात कुटुंबातील आई वडीलांचा आशीर्वाद , मुले कंद सिद्धेश, कंद सुदर्शन व अजित पवार याची टेक्निकल मदत होत आहे. शाळेतील मैत्रिणी, सर्व विद्यार्थी नातेवाईक यांचे सहकार्य आणि अर्थातच पती सुखदेव कंद यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठींबा या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे, असे त्या आवर्जून सांगतात.
आजपर्यंत त्यांच्या युट्युब चॅनलला असणारे ऑडिओ /व्हिडीओ…
देव माझा अंबरनाथ कीर्ती ज्याची त्रिखंडात
दंग होऊया हरीच्या भजनात
देवा तुझी मौज भरी
जागर जागर अंबेचा जागर
सिद्धेश्वर माझा नायगावाचा राजा
जोगेश्वरी नांदते नायगावांत
अवध में लौट आए राम
ऑडिओ
भीमरायाचे गुण गाया
माझ्या भीमाचा डंका वाजतोय साऱ्या जगात
माझ्या श्वासात जपलाय भीमराया
त्यांच्या लेखनाच्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. देव अंबरनाथाच्या गीत निर्मितीत त्यांना काळभैरवनाथ अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्ट पंच कमिटी, समस्थ लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावचे ग्रामस्थ व लोणी गावचे सुपुत्र दीपक काळभोर, दै. प्रभातचे पत्रकार बापूसाहेब काळभोर व देवस्थान चे पुजारी भैरवकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे